हल्लापीडित पत्रकार न्यायाच्या प्रतिक्षेत! ; पोलीस अधिक्षकांची घेतली भेट; संरक्षण देण्याची मागणी

बीड
Spread the love

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळीतील तीन पत्रकारांवर मागील काळात जीवघेणे हल्ले झाले असून एका प्रकरणाचा तपास तीन महिने होऊनही पूर्ण नाही तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटून आले आहेत. अद्यापही ते जखमी पत्रकार आणि कुटुंबातील सदस्यांच्या मागावर असल्याने धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्या घेऊन आज हल्लाग्रस्त पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली. या भेटीत ओढवलेल्या सर्व परिस्थिची कैफियत मांडून आमचे व आमच्या कुटुंबियांचे संरक्षण करा अशी मागणी केली.
बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटले. निवेदन देऊन हल्लाग्रस्त पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची कैफियत मंडली. ज्यात म्हटले आहे की, 20 मार्च 2020 रोजी दि कोरोमंडल किंग सिमेंट कंपनी (धर्मापुरी रोड, परळी वै) च्या प्रवेशद्वारावर पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे व संभाजी मुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये महादेव शिंदे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चरसुद्धा झाले. सदरील घटनेच्या तापासबाबत अद्याप आम्ही समाधानी नसून तीन महिने उलटून गेले तरी आरोपी अद्याप पकडण्यात आले नाहीत.
वरील नमूद घटनेच्या तपासात दाखवलेल्या दिरंगाईचे परिणामस्वरूप म्हणून दुसरी घटना घडली. पत्रकार संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर दि.11 मे 2020 रोजी हल्ला करण्यात आला. यामध्ये ते स्वतः त्यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले. या घटनेतील आरोपी पकडण्यात आले, मात्र जामिनावर सुटून आल्याने परत त्यांच्या घराभोवती फिरत आहेत. या दोन्हीही घटनांचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुलजी धस यांच्याकडे आहे.
दि.20 मार्च रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणि दि.11 मे रोजी घडलेल्या दोन्हीही गुन्ह्यातील आरोपी परळीतील रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहेत. आम्ही पत्रकार आणि आमचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहोत. भविष्यात आमच्यावर कोणत्याही स्वरूपाचे संकट येणार नाही ही शक्यता नाकारता येत नाही. तरी पोलीस अधीक्षक साहेबांनी दोन्हीही घटनेत स्वतः लक्ष घालावे व पीडित पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, पत्रकार संदीप बेदरे, नंदकुमार पांडव, दत्तात्रय काळे, परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, शहराध्यक्ष महादेव शिंदे यांची उपस्थिती होती. सदरील घटनेत कायदेशीर वाटेल अशी योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.
Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *