सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी

बीड
Spread the love

सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी
मंदीरं बंद असल्याने आर्थचक्र थांबले; भक्तांचीही दर्शची अडचण
परळी (प्रतिनिधी)
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळले जात आहे. या काळात सर्वकाही शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एकएका गोष्टीला चालू करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. लॉकडाऊनच्या आता तीसऱ्या महिन्यात जवळपास सर्वकाही सुरू करण्यात आले आहे. परंतू महाराष्ट्रातील देवालये आणखीही भक्तांना दर्शनासाठी सुरू करण्यात आलेली नाहीत. शासनाने आवश्यक अशी नियमावली तयार करून मंदीरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.
संपूर्ण देशातील २६ राज्यांमध्ये असणारे मंदीरं दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. परंतू महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप अशी कोणतीही परवानगी दिलेली नसल्यामुळे सर्व मंदीरं अद्यापही बंद आहेत. परळीचे प्रभू वैद्यनाथाचे मंदीर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतीर्लिंग असून, देशभरातून भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. येत्या आठवडाभरापासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला विशेष महत्व असते. या पार्श्वभूमीवर शासनाने योग्य अशी नियमावली करून दर्शनासाठी परवानगी द्यायला हवी अशी मागणी चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. प्रवाशी वाहतूक सुरू आहे, बाजारपेठा, हॉटेल्स आदी सर्वकाही सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदीरही सुरू केली जावे. परळीच्या अर्थव्यवस्थेचा ज्योतीर्लिंग हे प्रमुख कणा आहे. मंदीरच्या जवळ असणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांची दुकाने गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. छोट्या छोट्या व्यवसायीकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि येणाऱ्या श्रावण महिन्यात भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी प्रभू वैद्यनाथाबरोबरच महाराष्ट्रातील मंदीरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *