अंबाजोगाईतील ‘त्या’ २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू ; जिल्ह्यातील सहावा तर अंबाजोगाईतील पहिलाच मृत्यू

बीड
Spread the love

कोरोनाचा सहावा बळी; अंबाजोगाईतील ‘त्या’ २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू

अंबाजोगाई : येथील भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ वर्षीय तरूण कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे शुक्रवारी (दि. २६) निष्पन्न झाले होते. या तरूणाचा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला.

मुळचा गिरवली, ता. भूम (जि. उस्मानाबाद) येथील हा तरूण ट्रॅक्टरचालक होता. त्याचा भाऊ अंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागात राहतो. हा तरूण मागील आठवड्यात भावाकडे आला होता. सर्दी आणि ताप सुरू असल्याने तो दुसऱ्या दिवशी अंबाजोगाई शहारातील एका खाजगी रूग्णालयात गेला होता. डाॅक्टरांना शंका आल्याने त्याला शासकीय रूग्णालयात पाठविले. तिथे शुक्रवारी त्याचा थ्रोट स्वॅब तपासला असता तो कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज मंगळवारी दुपारी त्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अंबाजोगाईतच होणार अंत्यविधी :

दरम्यान, या तरुणावर अंबाजोगाई येथील बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंबाजोगाई नगर परिषदेने अंत्यविधीची तयारी पूर्ण केली असून त्या तरुणाचे नातेवाईक आल्यानंतर रात्रीतून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी दिली.

जिल्ह्यातील सहावा तर अंबाजोगाईतील पहिलाच मृत्यू :

मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील परंतु आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आलेली वृद्ध महिला, मातावळी येथील ३५ वर्षीय व्यक्ती, केज तालुक्यातील माळेगाव येथील महिला, परळी शहरातील महिला, गहुखेल येथील १५ वर्षीय मुलगा यांचा यापूर्वी मृत्यू झालेला आहे. मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु अंबाजोगाईत पाॅझिटीव्ह आढळून आलेल्या तरुणाचा आज मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या सहावर पोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *