गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई
Spread the love

गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्राशी संवाद

गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
सध्या महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. ३१ तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाउनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र एकदम लॉकडाउन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. दुकनं, उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल

पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणं हे जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाउन एकदम उठवणंही चुकीचं ठरेल. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल.

अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष

राज्यातलं अर्थचक्र कसं चालणार यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ७५ ते ८० टक्के कापूस खरेदीचाही विचार आहे असंही त्यांनी सांगितलं. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही. सध्या आपण करोना नावाच्या संकटाशी लढा देतो आहोत. राजकारण तुम्ही सुरु केलं असलं तरीही आम्ही सुरु केलेलं नाही. राज्यावरचं संकट टाळलं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *