राखेच्या प्रश्नी उपजिल्हाधिकारी महाडीक यांनी केला कारवाईचा श्रीगणेशा

परळी वैजनाथ
Spread the love

राखेच्या प्रश्नी उपजिल्हाधिकारी महाडीक यांनी केला कारवाईचा श्रीगणेशा

प्रशासनाने राख उपसास्थळी जाऊन घेतला वास्तव परिस्थितीचा आढावा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील राख समस्येचे मूळ असलेल्या थर्मलच्या राख साठवण ठिकाणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार डॉ. विपीन पाटील, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता एकनाथ शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेत कारवाईचा श्रीगणेशाच केला असे म्हणावे लागेल. ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत राख प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढू असा शब्द उपजिल्हाधिकारी महाडीक यांनी परळीकरांना दिला होता, आज त्याचाच प्राथमिक टप्पा म्हणजे त्यांनी राख उपसा ठिकाणी जाऊन सत्य परिस्थितीची पहाणी केली.

राखेच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राख उपसा ठिकाणी जर नियंत्रण आले तर पुढची सर्व सप्लाय चेन नियंत्रित करणे सोपे आहे. त्यासाठी आज अधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी करताना निर्देशनास आलेल्या जेसीबी, हायवा, टिप्पर आदी वाहनांच्या चालक मालकांची माहिती घ्यायचा प्रयत्न केला. परंतु, त्यात कोणी विशेष सहकार्य करत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. राखेच्या तळ्यात आणि परिसरात असलेल्या जेसीबी तसेच इतर वाहनांचे नंबर तसेच चेसीस नंबर यांची नोंद करून घेतली. ही सर्व माहिती आता उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आली असून त्यावर कोणत्याही क्षणी मोठी कारवाई होऊ शकते असे संकेत प्रशासनाने दिले आहे.

यावेळी मंडळ अधिकारी सुधाकर पुसदेकर, तलाठी अमोल सवईशाम, सतिश भुसेवाड, जी.एन राजुरे तसेच महानिर्मिती तर्फे औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता के. एम. राऊत, अभियंता होळंबे तथा महसूल विभागाचे व औष्णिक विद्युत केंद्राचे इतर अधिकारी व कर्मचारी आदींचा मोठा ताफा उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *