*’त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!*

बीड
Spread the love

*’त्या’ वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार!*

*धनंजय मुंडेंनी तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश*

बीड दि. ०९—– : ‘सरकारी काम आणि वर्षभर थाम्ब!’ या उक्तीप्रमाणे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईच्या बळी ठरलेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना 2 हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून भाग्यश्री राख यांची फाईल विविध टेबलांवर अडून बसली होती, अनेक अर्ज विनंत्या करूनही न्याय मिळेना म्हणून त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ व ‘न्युज १८ लोकमत’ आदी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते.

पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख यांना १ मे २०१० रोजी ऑपरेशन रक्षक मध्ये वीरमरण आले होते, भाग्यश्री या त्यांच्या पत्नीवर उदरनिर्वाह, लहान मुलीचे शिक्षण अशा अनेक समस्या आहेत. २०१८ मधील शासन निर्णयाप्रमाणे शहिदांच्या वारसांना २ हेक्टर जमीन देणे अभिप्रेत आहे. मात्र गेले अनेक दिवस शासकीय कार्यलयांच्या चकरा मारून व कागदपत्रांची पूर्तता करूनही आपल्याला जमीन मिळाली नाही, आपल्यावरील अन्याय दूर करावा असे निवेदन २६ जानेवारी रोजी भाग्यश्री ताईंनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते.

धनंजय मुंडे यांनी शहीद पत्नींच्या त्या निवेदनावर तात्काळ कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. नवीन जिल्हाधिकाऱ्यांची बीडला नियुक्ती होते न होते त्या आठवड्याभरातच भाग्यश्री ताईंनी आपल्याला न्याय मिळत नसेल तर आत्मदहन करू असा इशारा दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले.

त्यांनतर ना. मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून भाग्यश्री राख यांना तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांच्याशी देखील ना. मुंडेंनी संपर्क केला असून न्याय मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *