लोकनेते मुंडे साहेबांचे ‘वरळी’ कार्यालय हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने पुन्हा गजबजले

महाराष्ट्र
Spread the love

*लोकनेते मुंडे साहेबांचे ‘वरळी’ कार्यालय हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने पुन्हा गजबजले*

*वंचितांचा वाली अन् वाणी बनण्यासाठी सदैव कार्यरत – पंकजाताई मुंडे*

*’मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी वरळी परिसर दुमदुमला*

मुंबई दि. १२ ——- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वरळी येथील कार्यालयातून अनेकांचे जीवन घडले, यातून अनेकांना जशी राजकीय व सामाजिक दिशा मिळाली तशीच ती मलाही मिळाली. आता मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांच्याच प्रेरणेने या कार्यालयाच्या माध्यमातून वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी एक ‘समाजसेवक’ म्हणून जनसामान्यां करिता सदैव कार्यरत राहणार आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आज येथे हजारो कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वरळी येथील कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून आजपासून हे कार्यालय पुन्हा जनसेवेत दाखल झाले आहे. कुठलाही बडेजाव न करता एका साध्या कार्यक्रमाने व राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उदघाटन मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. मुंडे साहेबांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञाताई मुंडे, पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे,गौरव खाडे, प्रभाकरराव पालवे आणि मुंडे परिवाराच्या वतीने मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालयाचा शुभारंभ झाला. उदघाटनाचा कार्यक्रम जरी आज होता तरी गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काना कोप-यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत आले होते. प्रत्येकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचा स्विकार पंकजाताई मुंडे, खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यावेळी केला.

याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यां समोर आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, मुंडे साहेबांनी या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब, वंचित, पिडितांची कामे केली, त्यांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. यातून अनेक जण घडले, अनेकांना दिशा मिळाली. मला सुध्दा एक पिता व नेता म्हणून त्यांचेकडून राजकीय व सामाजिक दिशा मिळाली. या कार्यालयाच्या माध्यमातून मी आता त्यांचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवणार आहे. मराठवाडयाचा पाणी प्रश्न असो की हिंगणघाटची घटना, ते विषय जसे हाताळले तसे सामाजिक विषय मी प्राधान्याने हातात घेणार आहे. एक समाजसेवक म्हणून प्रत्येकांना सेवा देत राहणार आहे. जनतेच्या मनात जे स्थान मुंडे साहेबांनी मिळवलं, अगदी त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कार्यरत राहू.

*नेते, कार्यकर्त्यांची गर्दी*
—————————-
आजच्या कार्यक्रमास माजी मंत्री विनोद तावडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, जयकुमार रावल, सदाभाऊ खोत, खासदार सुजय विखे, आमदार सर्वश्री अतुल भातखळकर, अमित साटम, तुषार राठोड, सुरेश धस, लक्ष्मण पवार, माधुरी मिसाळ, मनिषा चौधरी, नमिता मुंदडा, राजेश पवार, अतुल सावे, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, डाॅ. भागवत कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, भीमराव धोंडे आदींसह विविध जिल्हयाचे भाजपचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, विविध संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*’मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी वातावरण दणाणले*
————————————
मुंडे साहेबांचे वरळीचे कार्यालय पुन्हा जनसेवेत दाखल झाल्याने उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, त्यांनी यावेळी दिलेल्या अमर रहे अमर रहे, ‘मुंडे साहेब अमर रहे’, ‘पंकजाताई मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले होते. हार तुरे नको फक्त आशीर्वाद घेऊन या पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जमलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *