परळीतील कलाकारांची ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची रंगीत तालीम…

परळी वैजनाथ
Spread the love

*परळीतील कलाकारांची ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची रंगीत तालीम…*

*वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात उभारतेय ‘शिवसृष्टी’*

परळी (दि.२२) —- : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २८ फेब्रुवारीला आयोजित महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत सिनेअभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहेत. तर जवळपास १५० कलाकार हे स्थानिक असणार आहेत. शहरातील हालगे गार्डन मंगल कार्यालयात या कलाकारांची रंगीत तालीम सुरू आहे.

या महानाट्याचे लेखक, दिगदर्शक व निर्माता महेंद्र महाडिक, मंदार खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम सुरू असून यामध्ये लहान मुले-मुली, तरुण, विद्यार्थी, महिला यांसह ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत. हे सर्वजण नाटकाच्या माध्यमातून विविध पात्रे भूषवत आपला अभिनय सादर करणार आहेत.

या तालमीसाठी ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक तथा निर्माता श्री. महेंद्र महाडिक, श्री. मंदार खाडे, श्री. अभिषेक रत्नपारखे, श्री. श्याम भुतेकर तर नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री. अजय जोशी, श्री. संजय सुरवसे, सौ. गौरशेटे ताई, श्री. सुनील देशमुख, सौ. विजयाताई दहिवाळ, सौ. सुलभाताई साळवे, सौ. अन्नपूर्णाताई जाधव, सौ. पल्लवीताई भोयटे यांसह आदी परळीतील कलाकारांची विशेष तालीम घेत आहेत.

*वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारतेय ‘शिवसृष्टी’…*

दरम्यान ‘शिवपुत्र संभाजी’ या ऐतिहासिक महानाट्यासाठी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात भव्य शिवसृष्टी साकारली जात आहे. दि. २८ फेब्रुवारी ते ०१ मार्च असे तीन दिवस दररोज संध्याकाळी ०७ ते १० असे नाटकाचे प्रयोग होणार असून दिवसभर शिवकालीन वस्तू, शिवकालीन गावरचना, शस्त्रास्त्रे आदींसह शिवसृष्टीचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे. अशी माहिती नाथ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *