अंधश्रदेच्या बाजाराने अनेक गावे जागली!

परळी वैजनाथ
Spread the love

अंधश्रदेच्या बाजाराने अनेक गावे जागली!

लहान मुलांच्या पालकांनी रात्र अक्षरशः जागुन काढली

रात्रभर अफवाच अफवा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अगोदरच कोरोनाने परेशान असलेल्या नागरीकांचे अफवांनी भंबेरी उडविली. अमुक गावातुन फोन आला “लहान मुलांना धोका आहे, रात्र जागून काढा, दवाखान्यात विचित्र बालक जन्माला आले आहे” अशा एक ना अनेक अफवांनी रात्रभर अक्षरशः धुमाकूळ घातला. अंधश्रदेच्या या बाजाराने अनेक गावांनी रात्र जागून काढली. नातेवाईकांनी एकमेकांना फोन करून सर्वांचीच झोप उडवली. अशा अफवा पसरवणारांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सध्या कोरोनामुळे जग परेशान आहे. सर्वजण लाॅक डाऊनमुळे घरातच आहेत. आपण एकविसाव्या शतकात असलो तरी अंधश्रदेचा लोकांवर विशेषतः ग्रामीण भागातील जनतेवर आणखी किती प्रभाव आहे याचा प्रत्यय रात्री आला. बुधवारी (दि. 25)रात्री उशिरा ग्रामीण भागात “दवाखान्यात विचित्र बालक जन्माला आले आहे, आपापली लहान बालके सांभाळा, झोपू नका” अशी अफवा पसरली. अवघ्या काही वेळातच वणव्याप्रमाणे अफवा अगदी घराघरात पोहचली. विशेष म्हणजे अनेकांच्या व्हाटस अपवर त्या विचित्र बालकाचे फोटोही पोहचले. मग ज्याला वाटेल तसे त्याने प्रसार केला. पाहता पाहता या अफवेने ग्रामीण आणि शहरी भागात धुमाकूळ घातला. अनेकांनी आपापल्या नातेवाईकांना फोन करून खात्री करून घेण्याच्या प्रयत्नात रात्र जागून काढली.
अफवेला मायबाप नसल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने माहिती जोडीत गेला आणि अफवा घराघरात पोहचली. रात्री उशिरा सुरू झालेल्या अफवेच्या फोनांनी उजाडले तरी झोपू दिले नाही. विशेष म्हणजे कुणीही ठोस काही सांगत नव्हते. असाच पाहुण्याचा निरोप आला, एवढेच सांगुन समोरच्या व्यक्तीची झोप उडवत होते. यामुळे अनेक उच्च शिक्षीत पालकांनीही लहान मुलांच्या काळजीपोटी रात्र जागून काढली. एवढे विज्ञान युगात असुनही अंधश्रदेच्या ताकदीचा हा अनुभव लज्जास्पद आहे.

जुनेच फोटो
अफवा आणि पसरलेल्या फोटोबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे फोटो जुनेच असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र या फोटोंनी रात्रभर दहशत निर्माण केली.
दरम्यान सध्या नागरीक कोरोनामुळे परेशान असताना मध्येच अशी विचित्र अफवा पसरल्याने अगोदरच हवालदिल असलेले नागरीक पुन्हा हैराण झाले असुन अशा विचित्र अफवा पसरवणारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *