परळी शहराची होणार चार भागांत विभागणी

परळी वैजनाथ
Spread the love

परळी शहराची होणार चार भागांत विभागणी

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन; आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल, डिझल नाही

परळी । प्रतिनिधी
कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. बीड जिल्हा आणि परळी शहरातही हे नियम लागू केलेले आहेत. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या दृष्टीने सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिथीलता देण्यात आली होती. मात्र गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने आता नवे पाऊल उचलले असून, परळी शहराची विभागणी चार भागांत केली जाणार असून, त्या त्या भागांतील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी त्याच विभागांत गर्दी न होऊ देता घरोघरी जावून करायची असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. काही महत्वपूर्ण बदलांच्या संदर्भात गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून सुधारीत सुचना केल्या आहेत.
परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी यासंदर्भात माहीती देतांना सांगितले की, शुक्रवारपासून परळी तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझल विक्री बंद असणार आहे. याचबरोबर ग्रामिण भागांत बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींबद्दल बरेच संभ्रम आणि शंका कुशंका आहेत. त्या दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक तयार केले गेले आहेत. ते प्रत्येक गावात जावून बाहेरगावहून गावात आलेल्या सर्वांची तपासणी करतील आणि नागरीकांमध्ये गर्दी न होऊ देता जनजागृती करतील. पुणे, मुंबई व ईतर ठिकाणहून तसेच ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी पोचण्याची परवानी देण्यात आली आहे. हे सर्व नागरीक परतल्यानंतर त्यांच्या नोंदी करून घेण्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
कर्फ्युच्या काळात बेघर आणि निराश्रीतांना मदतीसाठी प्रशासनाने अनेक समाजसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. परंतू त्यांनी आजपासून नागरीकांना संभाव्य धोके लक्षात घेता शिजवलेले अन्न देऊ नये. द्यायचेच असेल तर कोरड्या स्वरूपातील धान्य मदत म्हणून द्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापुढे तालुक्यात कुठेही आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत भरणार नाही. याची खबरदारी संबंधीत ग्रामपंचायती, त्यांचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घ्यायची आहे.

मुस्लीम बांधवांनी सहकार्य करावे
शुक्रवार हा मुस्लीम बांधवांचा सामुहीक नमाज पठणाचा महत्वाचा दिवस असतो. परंतू सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून राज्यभरात कर्फ्यु लावण्यात आला आहे. सर्वधर्मीयांना प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांकडून सहकार्यही होत आहे. याचप्रमाणे सामुहीक नमाज घेऊ नये. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, देशावर आणि संपूर्ण मानवमात्रावर आलेली हाणी टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून, त्यासाठी सहकार्य करावे व नमाज आपापल्या घरीच पठण करावे असे कळकळीचे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.

अत्यावश्यक कारणांसाठी पास!
जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी तसेच जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून पास देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठीही पास देण्यात येत असून, वैद्यकीय अडचण असेल तर त्यांनी संपर्क केल्यास त्यांनाही बाहेर जाण्यासाठी वैद्यकीय पास देण्यात येणार आहे. यासाठी 9921070690 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *