कन्टेटमेन्ट झोनचे परळीत झाले हसू

बीड
Spread the love

कन्टेटमेन्ट झोनचे परळीत झाले हसू
जिल्हाधिकारी साहेब जनता कर्फ्युचे अस्त्र बाहेर काढा!
परळी (प्रशांत प्र.जोशी-)
परळी शहरातील सर्वच 13 कन्टेटमेन्ट झोनचे अक्षरशः हसू झाले असून आओ-जाओ, घर तुम्हारा…अशी या झोनची अवस्था झाली आहे. पत्रे ठोकून झोन सील केले खरे परंतु झोनच्या मुख्य ठिकाणी पोलीस तर सोडा साधा होमगार्डसुद्धा तैनात नाही. जिल्हाधिकारी साहेब, परळीत रुग्णसंख्या 133 च्या वर गेली असून कन्टेटमेन्ट झोन नको तर परळीसाठी आता काही दिवसाचा जनता कर्फ्यूच लागू करा अशी मागणी सामान्य नागरिकांतून होतांना दिसत आहे. दरम्यान, बीडमधील प्रशासकीय बैठकीत परळीच्या अधिकार्‍यांनी संचारबंदी लागू करण्याबाबतची शिफारस केली असून कोरोनाची परळीतील साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु हेच आता रामबाण औषध ठरणार आहे. जेंव्हा परळीत 20 रुग्ण होते तेंव्हा कडकडीत बंद आणि आता दररोज रुग्णसंख्या 10 च्या आकड्यात वाढत असतांना अनलॉक कशासाठी? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
परळी शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोजच वाढत असून सलग तीन दिवसांतील 72 तासांत सुमारे 43 रुग्ण वाढले आहेत. 20 जुलैला परळीची रुग्णसंख्या केवळ 12 पर्यंत होती तेंव्हा जिल्हा प्रशासनाने काळजीचा भाग म्हणून लॉकडाऊन केला होता. 15 दिवसानंतर संचारबंदी शिथील केली आणि कोरोनाची साखळी वाढत वाढत 133 रुग्णसंख्येवर जाऊन पोहचली आहे. आताच खरी गरज संचारबंदी लागू करण्याची असून कोरोनाच्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परळी शहरात काही दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याची गरज आहे.
परळी शहरात सध्या 13 कन्टेटमेन्ट झोन असून त्याचे अक्षरशः हसू झाले आहे. या सर्वच झोनमध्ये पत्रे ठोकून सार्वजनिक वर्दळ थांबविण्याचा प्रशासनाने केविलवाणा प्रयत्न केला आहे. आओ-जाओ, घर तुम्हारा…अशीच अवस्था या सर्वच झोनची झालेली आहे. ठोकलेले पत्रे वर उचलून आतमध्ये चारचाकी वाहनांचीसुद्धा वर्दळ सुरु झाली असून काही दुकानांचे अर्धे शटरसुद्धा उघडलेले आहे. या कन्टेटमेन्ट झोनकडे पाहून प्रशासनाच्या कृतीवर हसावे की रडावे? अशी अवस्था झाली आहे. नियमानुसार झोनच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करावा लागतो परंतु, स्टाफ नाही असे कारण सांगीतले जात आहे.
प्रशासनाने सतर्क व्हावे
परळी शहर आणि तालुक्यातील वाढत चाललेली रुग्णसंख्या हा काळजीचा विषय असून परळीतील प्रशासनाने अधिक सतर्क होण्याची गरज आहे. कन्टेटमेन्टची घोषणा केवळ कागदावर असून नेमक्या ठिकाणी केवळ पत्रे लाऊन झोन सील केला जात आहे. दुसरीकडे व्यापारी, नागरिक यांच्या अ‍ॅन्टजेन्ट टेस्ट करण्याची गरज असून परळी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने दोन पाऊले पुढे येण्याची गरज आहे. कडक निर्बंध हे सुद्धा कागदावर असून फिल्डवर मात्र नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे ठिक-ठिकाणी दिसून येत आहे.
जनता कर्फ्युची शिफारस?
बीड येथे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना आजाराचा आढावा घेण्यात आला. परळीत रुग्णसंख्या वाढत असल्याने येथे जनता कर्फ्यु करण्याची शिफारस परळीतील अधिकार्‍यांनी केल्याचे वृत्त आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असल्याचे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले असून जिल्हाधिकारी येत्या काळात यावर निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता आहे. दरम्यान, परळीतील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि व्यापारी यांनी एकत्र येऊन परळीतील कोरोना साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच परळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे कोव्हीड सेंटर केल्यास स्थानिक रुग्णांवर येथे उपचार करणे सोयीचे होईल, अशीही मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *