कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे

बीड
Spread the love

*कोरोना आता दारापर्यंत आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात स्वतः स्वतःच्या कुटुंबापासून करा -ना. धनंजय मुंडे*

*’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन*

परळी (दि. १५) —- : जागतिक स्तरावर सुरू झालेला कोरोना विषाणूचा हाहाकार पाहता पाहता आपल्या घरापर्यंत येऊन पोचला असून, त्याला रोखण्याची जबाबदारी जितकी शासनाची आहे त्याहून अधिक जबाबदारी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाप्रति आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यासाठी खबरदारी घेत घराघरात जनजागृती करण्यासाठी सुरुवात स्वतः व स्वतःच्या कुटुंबापासून करावी असे आवाहन परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची ना. मुंडेंच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली होती; त्या बैठकीत ना. मुंडे बोलत होते.

कोरोना विषाणूचा कहर मी स्वतः अनुभवला असून, पहिल्या दिवसापासून राज्य सरकार म्हणून नव्हे तर परळीचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी लोकांत जाऊन काम केले, परंतु इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतरही काही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही.

कोरोना विषाणूला सामोरे जाताना सतत लॉकडाऊन हा उपाय नसून, स्वतः जागृत होऊन प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून काळजी आणि खबरदारी घेणे अनिवार्य आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत पुढील एक महिनाभर सातत्याने विविध उपाययोजना राबवून जनजागृती केली जावी व त्यानंतर संपूर्ण परळीत सरसकट कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, असेही ना. मुंडेंनी यावेळी बोलताना सांगितले.

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घ्यावी, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती आहे. मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, कोरोनापासून १००% मुक्ती हे प्रमुख उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. आपल्या जीवाची व इतरांच्या जीवाची पर्वा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानाद्वारे कोरोनविरुद्धचा लढा घराघरात बळकट करावा, असेही यावेळी ना. मुंडे म्हणाले.

*संसर्ग झाला म्हणून संपर्क तोडू नका मानसिक आधार द्या*

परळीच्या जनतेने मला भरभरून दिले आहे, सबंध परळी हे माझे कुटुंब आहे, करोनामुळे मी जे भोगलं आहे ते माझ्या लोकांना मला भोगू द्यायचं नाही. त्यामुळे घाबरून न जाता कोरोनाचा बाऊ न करता, संसर्ग झालेल्या रुग्णाप्रति कोणताही आकस न दाखवता आपल्या माणसांची काळजी घ्यावी, संसर्ग झाला म्हणून संपर्क तोडू नये मानसिक आधार द्यावा असे भावनिक आवाहन यावेळी ना. मुंडे यांनी केले.

यावेळी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके, माजी नगराध्यक्ष दीपकनाना देशमुख, रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी, ज्येष्ठ नेते माधवराव ताटे आदींनीही आपले विचार व्यक्त करत या अभियानांतर्गत सहभागी होऊन आपल्या कुटुंबापासून खबरदारी व जागृती अभियान सुरू करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या बैठकीस शहरातील सर्व नगरसेवक, रा. कॉ. पक्षाचे सर्व पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी संचलन केले तर शंकर कापसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*परळी शहर व्यापारी संघटनेची बैठक*

दरम्यान ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी शहरातील प्रमुख व्यापारी संघटनांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ना. मुंडे यांनी नागरिकांमध्ये जास्तीत जास्त खबरदारी जनजागृती करण्यासह अवश्यकता भासल्यास जनता कर्फ्यु करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी नागरिकांचे आरोग्य व कोरोनाचा वाढता संसर्ग आदी बाबींचा विचार करून जर आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यु लागू केला तर त्यासाठी सबंध व्यापाऱ्यांचा पाठिंबा असेल असे सर्व उपस्थित व्यापारी बांधवांनी ना. मुंडे यांना आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *