ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर

अंबाजोगाई
Spread the love

ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले हनुमान वाडीतील त्या चिमूरडीचे पालकत्व : संगीता तूपसागर

बीड : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील हनुमानवाडी येथील एका चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अशा परिस्थितीत या चिमुरडीच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे गरजेचे असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या चिमुरडीचे पालकत्व स्वीकारून आपले पालकत्व सिद्ध केले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता तूपसागर (भोसले) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
शिरूर तालुक्यातील हनुमानवाडी येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच या घटनेतील नराधमास फासावर लटकवा, अशी मागणीदेखील आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आली. परंतु, या मागणी पलीकडे याची कोणीही, कोणतेही सहकार्य केले नसल्याची बाब समोर आली. ही बाब समोर येताच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता तूपसागर (भोसले) यांनी तात्काळ या चिमुरडीची आणि तिच्या या दुर्दैवी पालकांची हनुमानवाडी येथे जाऊन भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारणा केली असता त्यांनी अद्यापपर्यंत शासकीय जिल्हा रुग्णालयातील उपचारा शिवाय कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले. चिमुरडीच्या पालकांचे म्हणणे ऐकून घेत संगीता तूपसागर यांनी तात्काळ थेट जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती त्यांना दिली. ना. धनंजय मुंडे यांनी देखील विनाविलंब या चिमुरडीचे पालकत्व स्वीकारत ते म्हणाले की, यापुढील उपचारासह कोणतीही मदत करण्यास मी तयार असून पालकांनी त्यांना काय हवं ते संगीताताई यांच्याकडे सांगावे. एकूणच या चिमुरडीला न्याय मिळेपर्यंत म्हणजेच शेवटपर्यंत तिच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी सोबत आहोत, अशी भावना देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान संगीता तूपसागर म्हणाल्या की, नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला वकील आघाडीची स्थापना केली असून या चिमुरडीला न्यायालयीन लढाई लढताना आमच्या वकील संघाच्या महिला सहकार्य करतील. याशिवाय या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू, असेही यावेळी संगीता तूपसागर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *