दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार-ना.धनंजय मुंडे

मुंबई
Spread the love

*दिव्यांग आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देणार- धनंजय मुंडे*

मुंबई दि.14 ——- दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी या महामंडळांच्या अडीअडचणी सोडवू तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्याही काही समस्या आहेत, त्या सोडवून या दोन्ही महामंडळाच्या कामकाजाला गती देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात आज दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदि उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले दिव्यांग व्यक्तीसाठीच्या योजनांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. दिव्यांगांसाठी मोबाईल व्हॅनची योजना सुरु करण्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळऊन देऊ. महामंडळांसाठी नवीन योजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले.

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल 300 कोटीवरुन 500 कोटीपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. एनएसएफडीसी वसुलीसाठी आवश्यक असणारा निधीही मिळवू. महामंडळामध्ये 2012 ते 2015 च्या कालावधीत झालेल्या अनियमिततेबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. महामंडळामार्फत केलेल्या अवैध नोकरभरतीबाबतही त्वरीत कार्यवाहीकरण्याचे निर्देषही श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

या दोन्हीही महामंडळांच्या लाभार्थ्यांना योग्य अशा योजनाचा लाभ देण्यासाठी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिशन मोडमध्ये काम करावे. शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश डिंगळे, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम बगाडे व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *