इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे

मुंबई
Spread the love

*इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सनियंत्रणाची जबाबदारी श्री.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे*

*मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी दिली माहिती*

मुंबई, दि.15……. मुंबईच्या इंदू मिल जागेवर बांधण्यात येणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या सनियंत्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे देण्यात आली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबतचा निर्णय होऊन उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचे स्मारकाच्या कामाचा आढावा आज मंत्रिमंडळाने घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री माध्यमांना माहिती देत होते. इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.

या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात याव्यात असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक इंदू मिल येथे करण्याबाबतचा निर्णय आघाडी सरकारनेच पूर्वी घेतला होता. परंतु, गेल्या पाच वर्षात या कामाला गती मिळू शकली नाही.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामात आपला सहभाग असावा, अशा प्रकारची इच्छा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मा.मुख्यमंत्री व मा.उप मुख्यमंत्री यांनी इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली आहे. एमएमआरडीअे ही नोडल एजन्सी म्हणून काम करणार असली तरी या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी कामाच्या प्रतिपूर्तीची व सनियंत्रकाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या प्रकल्पाची जबाबदारी मंत्रिमंडळाने सोपवल्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे आणि उप मुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांचा मनापासून आभारी आहे, अशी प्रतिक्रिया श्री.मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *