‘जल्लोष तरुणाईचा’ : महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सांगता

परळी वैजनाथ
Spread the love

*’जल्लोष तरुणाईचा’ : महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सांगता*

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

‘जल्लोष तरुणाईचा’ हे ब्रीद घेऊन युवा मनाचा आविष्कार , स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात गेल्या दोन दिवसात पाहावयास मिळाला. पहिल्या दिवशी आनंदनगरी या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांचा शुभहस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी , संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, प्रा .डॉ. विद्या देशमुख , प्राचार्या डॉ .आर. जे .परळीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती . आनंदनगरी , रेट्रो व विविध फनी गेम या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी पहिला दिवस दणाणून सोडला .
पहिल्या दिवसाच्या आनंदाला आणखी उभारी देत दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात शेला पागोटे या कार्यक्रमाने झाली . मुलींच्या कल्पनाविलासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत स्नेहसंमेलन उद्घाटन व पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला .
या कार्यक्रमासाठी उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ .आर. जे. परळीकर, संचालिका डॉ. मीनल लोहिया व मनोहर कांबळे, छाया देशमुख, प्रा .डॉ.विद्या देशमुख, प्रा. डॉ. विनोद जगतकर, प्रा. डॉ. प्रवीण दिग्रस्कर यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांच्या शुभेच्छा लाभल्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . प्रवीण फुटके यांनी केले . संजय देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कै. शामरावजी देशमुख आणि महाविद्यालयाच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतींना सर्वप्रथम अभिवादन केले. विद्यार्थिनींना उद्देशून ते म्हणाले की तुमची उपस्थिती आम्हाला प्रसन्न करते. तुमच्या प्रसन्न वयामध्येच यावसं वाटतं.अशा प्रकारचे कार्यक्रम कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ मिळवून देतात. व्यक्तिमत्व विकासासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात,त्याचा आपणा सर्वांनी आनंद घ्यावा. त्यासोबतच आपल्या मैत्रिणींच्या कर्तृत्वाला दाद देणे हा एक फार मोठा सद्गुण आहे , तो सर्वांनी जपावा आणि संवर्धित करावा. अशा प्रकारचा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ .आर.जे. परळीकर मॅडम यांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करताना प्रा . डॉ . विनोद जगतकर यांनी महिलांच्या शिक्षणाची गंगा परळीपर्यंत आणण्याचे कार्य कै. शामरावजी देशमुख यांनी केले त्यामुळेच परळीसारख्या शहरांमध्ये सुरक्षित पद्धतीने मुली शिक्षण घेत आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाच्या प्रसंगाचा आधार घेऊन त्यांनी ‘अत्त दीपं भव’ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा ! असा अनमोल संदेश विद्यार्थिनींना दिला .
या कार्यक्रमात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरवही करण्यात आला . याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांचा आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचा राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि श्रीनाथ सेवा प्रतिष्ठान नाथरा परळी चा साहित्य सेवागौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला . तसेच प्रा . वीणा पारेकर यांना संस्कृत विषयातील यूजीसी च्या वतीने दिली जाणारी राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले.
द्वितीय दिवसाच्या सायंकालीन सत्रात विद्यार्थिनींच्या कलागुणांना आविष्कृत करणारा व भारतीय संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन घडविणारा रंगारंग असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला . यात प्राचीन भारतीय नृत्याविष्कारासोबत राष्ट्रभक्तीपर गीत , लावणी , सिनेगीत , गोंधळ आदींवर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. आर.के.यल्लावाड, आभार प्रा. डॉ.खिल्लारे यांनी मानले . या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .आर. जे .परळीकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली . या दोन दिवसात विद्यार्थिनींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *