मिलिंद विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

परळी वैजनाथ
Spread the love

मिलिंद विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

परळी वैजनाथ: (वार्ताहर) आज दिनांक 1 फेब्रुवारी 2020 रोजी मिलिंद माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी, जबाबदारीची जाणीव होऊन अध्यापन अनुभव यावे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकूण 65 विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य उत्कृष्टरित्या पार पाडले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सर्वोत्कृष्ट विद्यार्थीशिक्षक निवडीचे परीक्षण कार्याची महत्त्वाची जबाबदारी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. काळे जे. एन, श्रीमती कोमावर एस. जी. व सहशिक्षिका बनसोडे प्रतिक्षा मॅडम यांनी पार पाडली.
उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक म्हणून कसबे अंजली, सानिका बुरांडे, विशाखा रोडे यांची निवड झाली; तर उत्तेजनार्थ पारितोषिक चि. गायकवाड कबीर यांना देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार के. एन. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक श्री. कोमावर आर. जी. व सहशिक्षक श्री कांबळे वसंत मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या कार्यक्रमास विद्यार्थी मुख्याध्यापिका कु. वैष्णवी गित्ते, उपमुख्याध्यापिका कु.तांदळे रोहिनी व पर्यवेक्षिका कु. रणखांबे यशश्री मंचावर उपस्थित होत्या.

शाळा भरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत शालेय व्यवस्थापनाची व प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी दहावी वर्गातील या विद्यार्थ्यांनीच उत्कृष्टरित्या पार पाडली. दैनंदिन परिपाठ शाळेतील नववी (क) च्या विद्यार्थिनींनी खूप सुंदररित्या सादर केला. त्यांना वर्गशिक्षक श्री. बिडकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका व पर्यवेक्षिका म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पडणाऱ्या विद्यार्थिनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय आठवणींना उजाळा देत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या. आवडत्या शिक्षकांचा नामोल्लेख करत आपल्याला या शाळेतून खूप काही मिळाले आहे आणि या ज्ञानाचा समाज जीवनात वावर करत असताना आम्ही स्वतःसह शाळेचे नाव उज्वल करू अशी भावना व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी मिलिंद विद्यालयात कार्यरत अभ्यासू, प्रेमळ शिक्षकवृंदांचे ॠण व्यक्त केले. तसेच शिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा परळी तालुक्यात फक्त आपल्या शाळेतच आहे असा वारंवार उल्लेख आपल्या भाषणात केला.

शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असे गौरवोद्गार शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार के एन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपल्या अध्यक्षीय समारोपात काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक श्री.कोम्मावार सर यांनी केले तर श्री. कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल दहावी वर्गाचे वर्गशिक्षक श्री. शौकत पठाण सर व श्री. नितीन व्हावळे सर यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचलन व्हावळे एन.एन. तर आभार प्रदर्शन काळदाते एस.एस. यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *