गोपीनाथ गड होतोय आता यात्रेकरूंचेही तीर्थस्थान…

आंतरराष्ट्रीय

सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी उर्जा व प्रेरणा देणारा गोपीनाथ गड आता यात्रेकरूंचेही तीर्थक्षेत्र बनला आहे, याचा प्रत्यय आज आला. दोन धाम यात्रेसाठी गेलेले भगवान गड परिसरातील अडीच हजार भाविक आपल्या परतीच्या प्रवासात गोपीनाथ गडाच्या चरणी आज नतमस्तक झाले. लाडक्या लोकनेत्याचे दर्शन घेतल्यानंतरच  आपली यात्रा सफल झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.
पाथर्डी तालुक्यातील येळेश्वर संस्थानचे महंत ह. भ. प. रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान गड परिसराच्या विविध गावांतील सुमारे अडीच हजार भाविक उज्जैन, मथुरा, काशी, वृंदावन, गोकुळ, अयोध्या आदी दोन धाम यात्रेकरिता १६ मे रोजी निघाले होते. तेरा दिवसांच्या त्यांच्या प्रवासात ३५ ट्रॅव्हल्स, अनेक चार चाकी वाहने तसेच सर्व खानसामा सोबत होता. भगवान गड परिसरातील खरवंडी, मालेवाडी, किर्तनवाडी, भालगांव, उकांडा, येळी, फुंदेटाकळी, जिरेवाडी,नागलवाडी, घोगस पारगांव, फुलसांगवी आदी जवळपास २५ ते ३० गांवातील अडीच हजार  वयोवृध्द महिला, पुरूष तसेच युवक वर्ग  यात्रेत सहभागी झाले होते. परतीच्या प्रवासात काल औंढा नागनाथाचे दर्शन घेऊन ते सर्वजण रात्रौ परळी येथे मुक्कामास होते.  सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन झाल्यानंतर दुपारी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील समाधीचे दर्शन घेतले.

यात्रेकरूंचे तीर्थस्थान
—————————
लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे दीन दुबळे व वंचितांचे कैवारी होते. सामान्य माणसांसाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले, त्यामुळेच अनेकांच्या देवघरात आजही देवांसोबत त्यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. मुंडे साहेब आपल्यात नसले तरी केवळ समाधीच्या दर्शनाने उर्जा मिळते म्हणूनच सामान्य माणूस, कार्यकर्ता, नव विवाहित जोडपी, शाळकरी मुले, वयोवृध्द मंडळी यांची याठिकाणी दररोज येथे गर्दी असते. अशा लोकनेत्याचे दर्शन घेऊनच आपली दोन धाम यात्रा सफल करण्याचा निश्चय भाविकांनी केला होता आणि तसा आनंदही त्यांच्या चेह-यावर दर्शनानंतर स्पष्ट दिसत होता.

खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी केली आस्थेवाईकपणे विचारपूस
——————————
अडीच हजार भाविक दर्शनासाठी  गोपीनाथ गडावर आल्याची माहिती मिळताच खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी  यात्रेचे प्रमुख रामगिरी महाराज यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची व सर्व भाविकांची आस्थेने विचारपूस केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी महाराजांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *