उद्या अजित पवार बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, परळीत राष्ट्रवादीचे उमेदवार करणार अर्ज दाखल

बीड

उद्या अजित पवार बीड जिल्ह्यात
गेवराई, माजलगाव, परळीत राष्ट्रवादीचे उमेदवार करणार अर्ज दाखल
बीड (रिपोर्टर):- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातल्या चर्चीत विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उद्या बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत असून सकाळी गेवराई, दुपारी माजलगाव आणि सायंकाळी ते परळीत धनंजय मुंडेंच्या समवेत असणार आहेत. परळीत अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीत प्रचंड उलतापालथ झाल्यानंतर धनंजय मुंडे हे एकटे जिल्ह्याची खिंड लढवत आहेत. दस्तुरखुद्द शरद पवारांनी उमेदवार्‍या घोषीत करून बीड जिल्ह्यातील मतदारसंघात तरुण चेहर्‍यांना संधी दिली आहे. उद्या गेवराई, माजलगाव, परळीमध्ये उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यासाठी दस्तुरखुद्द अजित पवार बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत आहेत. उद्या सकाळी गेवराईत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. दुपारी माजलगावमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असून सायंकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या अनुषंगाने अजित पवार हे त्यांच्या सोबत असून परळीत जाहीर सभा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *