मोदींच्या सभेसाठी गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ कॉलेज समोर असलेल्या मैदानाची पोलिसांनी केली पाहणी

परळी

परळीतल्या पंतप्रधानांच्या सभेसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली जागेची पाहणी

परळीत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नंतर परळीत येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कुठलीच कसर राहू नये याकरिता पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे.आज औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ कॉलेज समोर असलेल्या मैदानाची पाहणी केली यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार हे उपस्थित होते.

parali-ground-1

महायुतीच्या उमदेवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 ऑक्टोबर रोजी परळीत प्रचार सभा घेणार आहेत. यासभेसाठी लाखो नागरिक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. गोपीनाथ गड परिसर विस्तीर्ण असल्याने या जागेची पाहणी आज विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली. याबरोबरच वैद्यनाथ कॉलेज समोरील असलेल्या मैदानाची पाहणीही त्यांनी केली. यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. याच मैदानावर अटल बिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नसले तरी आज गोपीनाथ गड, वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणाची पाहणी प्रशासनाने केली आहे. यावेळी महानिरीक्षकांसोबत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, संभाजीनगर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे यावेळी उपस्थित होते.

आयोजकांचे वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणालाच सभेसाठी प्राधान्य

नरेंद्र मोदींच्या सभेची जागा निश्चित झालेली नाही.सुरक्षेच्या सर्व बाबी पडताळूनच सभेची जागा ठरवण्यात येणार असल्याचे दिसते. पोलीस महानिरीक्षकांनी गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानाची पाहणी सभेसाठी केली आहे. वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणात या सभेसाठी निवडले जाऊ शकते,आयोजकांकडून याच जागेला प्राधान्य दिले असल्याचे समजते. वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात स्वच्छतेला सुरुवात झाली असून याठिकाणी जेसीबी च्या साह्याने काम सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *