ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या गोपीनाथ गडावर होणार आरोग्य यज्ञाला सुरवात

आंतरराष्ट्रीय

*खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केली महा-आरोग्य शिबीराची संपूर्ण जय्यत तयारी*

*• २०० डाॅक्टर्स • ४० स्टाॅल • कॅन्सर, किडनीसह विविध ५० हून अधिक रोगांचे निदान • पुरूष व स्त्री रूग्णांची स्वतंत्र व्यवस्था*

परळी दि. ११ —– लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती उद्या १२ डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबीराची संपूर्ण जय्यत तयारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून आलेल्या रूग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित, पीडित घटकांना आधार देण्याचे काम केले जाते. यावर्षी संपूर्ण जिल्हयात दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूरांच्या हातात पैसा नाही, अशा स्थितीत गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य शिबीराचे आयोजन करून लोकनेत्याची जयंती साजरी करण्याचे ठरवले आहे.

१२ व १३ डिसेंबर अशा दोन्ही दिवशी हे शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. दरम्यान, गोपीनाथ गडावर होणार असून उद्या सकाळी ९ वा. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांच्या उपस्थितीत शिबीराचा शुभारंभ होणार आहे.

*२०० डाॅक्टर्सचा सहभाग*
——————————-
अंबाजोगाई येथील स्वा. रा.तीर्थ वैद्यकीय रूग्णालया बरोबर जिल्हा व उप जिल्हा रूग्णालय तसेच खासगी रुग्णालयातील सुमारे दोनशे डाॅक्टर्स शिबीरात सहभागी होऊन रूग्णांची तपासणी करणार आहेत, त्यासाठी गोपीनाथ गडावर चाळीस स्टाॅल्स उभारण्यात आले असून पुरूष, स्त्रिया व लहान मुलांची स्वतंत्रपणे तपासणीची सोय करण्यात आली आहे. शिबीरात मुख कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराॅईड, लिव्हर, किडनी आदी पन्नासहून अधिक आजारांची तपासणी तसेच पुरूष व स्त्रियांसाठी हार्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भपिशवी, दुर्बिनीद्वारे बिनटाक्याचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणावर उपचार, चष्मे वाटप, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया बरोबरच हाडांच्या ठिसूळपणाची चाचणी व कृत्रिम अवयवांचे वाटप होणार आहे. शिबीराचा गरजू रूग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *