*डॉ. प्रितमताई मुंडे यांची ओटी मतदानरुपी आशीर्वादाने भरा – ना. पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*

महाराष्ट्र

*जिरेवाडीच्या विराट जनसमुदायाने दिली मोठ्या मताधिक्याची ग्वाही ; महिलांनी वज्रमुठ करून लेकीला पाठिंबा*

परळी दि. १०….वडीलांच्या पाठिमागे त्यांचा जनसेवेचा वारसा आम्ही चालवत आहोत, आमच्या कर्तृत्वाने आम्ही नेतृत्व सिद्ध केले असुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव अजरामर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना घरातीलच भेदी लोकांनी साहेबांचे नाव मिटवण्याचा विडा उचलला आहे, पण तुम्ही त्यांना थारा न देता तुमची लाडकी लेक खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांची मतदानरुपी आशीर्वादाने भरा असे भावनिक आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील विराट जनसमुदायाने मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली तर महिलांनी मुठी आवळुन हात उंचावून आपला एकमुखी पाठिंबा दर्शविला.

बीड लोकसभेच्या भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई यांच्या प्रचारार्थ जिरेवाडी येथे विराट सभा झाली. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, जेष्ठ नेते बंकटराव कांदे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, श्रीराम मुंडे, ज्ञानोबा माऊली फड, माधवराव मुंडे, पांडुरंग फड, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभूते, राजा पांडे, रवी कांदे, सुग्रीव मुंडे, हरिष नागरगोजे, विष्णू गिते, गोवर्धन कांदे, संजय मुंडे, सहदेव कांदे, नानाभाऊ मुंडे, श्रीरंग मुंडे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब मंत्री म्हणून परळीला येऊ शकले नाहीत हे दुःख मी कधीच विसरू शकणार नाही. भरल्या ताटावरून नियतीने साहेबांना नेले म्हणून प्रितमताईंना राजकारणात यावे लागले. मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध करून जिल्ह्यात विकासाचा कलश आणला. गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या परळी – बीड – नगर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावला. त्याचे काम जिरेवाडीच्या शिवारापर्यंत आले आहे. लवकरच रेल्वे धावणार आहे. जिल्ह्यात तब्बल अकराशे कोटी रूपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले आहे. विकासाला आणखी गती देण्यासाठी तुमच्या आशिर्वादाची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. आमच्यावर टीका करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना विकास दिसत नाही कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ बारामतीकरांचे जोडे उचलण्यातच जात आहे. पण स्त्रीचा आवमान करणार्‍यांना समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

*बायपास होणार राष्ट्रीय महामार्ग*
—————————-
परळी बायपास झाला नाही अशी टीका विरोधक करत आहेत पण आता हा बायपास राष्ट्रीय महामार्ग झाला असून त्याचे टेंडरही झाले आहे आणि रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विकासाला आम्ही बहिणी कधीच कमी पडणार नाहीत असे सांगून विविध विकासाच्या योजना राबवून जिल्ह्य़ात विकासाला चालना दिली आहे. साहेबानंतर आम्हीच विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे. जलयुक्त शनिवारच्या माध्यमातून अनेक कामे करून पंतप्रधान ग्रामसडक योजनेने ग्रामीण भागातील रस्ते तयार केले. यामुळे चोहीकडे विकासाची चळवळ गतीमान केली आहे.
आम्ही केलेला विकास विरोधकांना दिसत नाही असे सांगून विकासावर बोलण्यासारखे नसल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन जातीभेदाचे विष पेरायला सुरुवात केली आहे पण जनता त्यांना पुर्ण ओळखुन आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*राष्ट्रवादीला भवितव्य नाही, मत कशाला देता?*
——————-
राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही भवितव्य नाही चार खासदारांचा पक्ष या निवडणुकीनंतर दिसणारही नाही त्यामुळे भविष्य नसलेल्यांना मत कशाला द्यायचे असा सवाल करून डॉ. प्रितमताई मुंडे यांना भवितव्य आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे सांगून डॉ. प्रितमताई या तुमची लेक आहेत. कर्तृत्ववान लेकीची ओटी मतदानरुपी आशीर्वादाने भरून तिला संसदेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

*महिलांनी वज्रमुठ करून दिला पाठिंबा*
————————
यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द देऊ का असा प्रश्न विचारताच उपस्थितांनी हात उंचावून हो असा प्रतिसाद दिला तर महिलांनी मुठी आवळुन, हात उंचावून जोरदार प्रतिसाद दिला.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *